Swami Public Limited – Marathi Movie

अधिकाधिक पैसा मिळवून अधिकाधिक श्रीमंत होणं या एकमेव ध्येयाला सामोरं ठेवून जगणाऱ्या आजच्या पिढीला तणावपूर्ण आयुष्य जगावं लागत आहे. त्यामुळे अशा आयुष्यामध्ये सुख-शांती मिळवण्यासाठी ही पिढी आता अध्यात्माकडे वळत आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा आता काही कॉर्पोरेट कंपन्या घेत आहेत. त्यांनी या श्रद्धेचा बाजार मांडायला सुरुवात केली आहे आणि त्यातूनही नफेखोरी करण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढले आहेत. शुद्ध, निरामय जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अध्यात्मालाही आता कॉर्पोरेट जगताने पोखरले आहे. याच विषयावर भाष्य करणाऱ्या कथेवर आधारित ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा चित्रपट आता रसिकाच्या भेटीला येत आहे.
नावाप्रमाणे अत्यंत हटके कथाविषय असलेल्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केलं असून नुकताच गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला. याप्रसंगी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर विजय मुंडे, सहनिर्माते विवेक वाघ, लाईन प्रोड्युसर विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सारथी एन्टरटेनमेन्ट’ या बॅनरची प्रस्तुती असलेला ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ या मल्टिस्टारर चित्रपटात सुबोध भावे, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, विनय आपटे, सविता मालपेकर, मिलिंद शिंदे, भारत गणेशपुरे आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच पदार्पण करत असलेली नवोदित अभिनेत्री संस्कृती खेर ही जोडी एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळणार आहे.
पूनम शेंडे निर्मित ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ या चित्रपटाची संकल्पना विजय मुंडे यांची असून तिला कथारुपात गुंफण्याचं काम दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी केलं आहे. गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटासाठी गीतलेखनही केले असून हिंदी भाषेत लिहिलेल्या या गीतांना ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी संगीत दिले आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रख्यात गायक पं. अजय चक्रवर्ती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गायक सुखविंदर सिंग यांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ या चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील विविध निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आले असून आपल्या अप्रतिम छायाचित्रणाच्या सहाय्याने विक्रम अमलादी यांनी या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन सिद्धार्थ तातूस्कर यांचे असून रंगभूषा महेश बराटे यांनी तर वेशभूषेची जबाबदारी सोनिया सहस्त्रबुद्धे यांनी निभावली आहे. सिद्धार्थ घाडगे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून लाईन प्रोड्युसरची जबबादारी विनोद सातव व आश्विनी तेरणीकर यांनी समर्थपणे पार पाडली आहे.

एकंदरीतच दमदार कथानक, मराठीतील आघाडीचे कलाकार, श्रवणीय संगीत आणि कल्पक दिग्दर्शन यामुळे ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा चित्रपट मराठी रसिकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. 22 August हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल होणार असून तत्पूर्वी या चित्रपटाच्या फर्स्ट लूकला सोशल मिडियावर नेटिझन्सचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *