Rama Madhav – History Repeated

Gopikabai a

Gopikabaia

काळाच्या ओघात किती गोष्टी बदलल्या पण त्या काळातही आणि आजही कायम असलेली गोष्ट म्हणजे ‘प्रेम’ . बदलत्या काळानुसार प्रेमाचे स्वरूप बदलले पण मूळ भावना तीच राहिली. इतिहासात डोकावले तर अनेक प्रेमकथा सापडतील मग ती बाजीराव – मस्तानी असो व सलीम – अनारकली… या सगळ्यात अबोल प्रेमाची अजरामर प्रेमकथा होती ती म्हणजे ‘रमा माधव’ची. रमा माधव यांच्या प्रेमाला अल्पायुष्य मिळालं तरी ते पूर्णत्वाला गेलं. ‘रमा माधव’ म्हटलं कि कित्येक वर्षांपूर्वी मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांनी स्वामी मालिकेत साकारलेल्या अविस्मरणीय भूमिकांचे स्मरण होतं. तेव्हा रमाबाई साकारणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आगामी ‘रमा माधव’ या मराठी सिनेमातून दिग्दर्शनात दुसरं दमदार पाऊल टाकताहेत. विशेष म्हणजे त्या काळची रमाबाई व माधवराव पेशव्यांची भूमिका साकारणारी मृणाल कुलकर्णी व रवींद्र मंकणीची सुपरहिट जोडी या सिनेमात नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाईची भूमिका साकारताहेत.

Nanasaheb

आजवर अनेक ऐतिहासिक मालिका आणि चित्रपटांमधून दमदार भूमिका साकारणाऱ्या या दोन्ही हरहुन्नरी कलावंतांनी आपल्या याही भूमिकांमध्ये समरसतेने अभिनय केलाय. नानासाहेब पेशवे हे मुत्सुद्देगिरी, चोख हिशेब, कारभारावर घारीसारखी नजर आणि योग्य न्यादानामुळे ते रयतेच्या गळ्यातले ताईत होते. जातीभेद राज्याला घातक आहे हे ओळखून त्यांनी रयत, मुसुद्दी, सरदार आणि खुद्द पेशवे हे छत्रपतींचे चाकर आहेत ही भावना रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नानासाहेबांच्या व्यक्तिरेखेतील अनेक कंगोरे रवींद्र मंकणी यांनी ‘रमा माधव’ चित्रपटामध्ये लीलया साकारलेत. रविंद्र मंकणी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत पेशवे घराण्यातील सर्व पेशवे साकारलेत फक्त थोरले नानासाहेब पेशवे साकारायचे राहिले होते, या चित्रपटाच्या निमित्ताने ती व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली शिवाय अभिनेत्री म्हणून मृणाल जितकी परिपक्व आहे तितकीच दिग्दर्शिका म्हणून तिचा अभ्यास कौतुकास्पद असल्याचे मनोगत रवींद्र मंकणी यांनी व्यक्त केले.

नानासाहेबांच्या पत्नीच्या गोपिकाबाईंच्या व्यक्तिरेखेला देखील अनेक कंगोरे आहेत. तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या, धोरणी पेशवीण म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणात रस असलेल्या गोपिकाबाईंचा विवाह खुद्द छत्रपतींनी लावून दिला होता. चुलत दिरापासून आपल्या वारसाच्या हक्काला धोका आहे, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी गृहकलह सुरु केला. गोपिकाबाईंची ही वेगळी भूमिका मृणाल कुलकर्णी यांनी तितक्याच तडफदारपणे साकारली आहे. प्रत्येक अभिनेत्रीला ज्या भूमिकेचे आव्हान असतं अशा स्वरुपाची ही भूमिका असून तुम्ही मला रमाच्या सासूच्या भूमिकेत पहाल अशी प्रतिक्रिया मृणाल यांनी दिली. सोबत ‘रमा माधव’ च्या निमित्ताने एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. बऱ्याच अवधीनंतर मृणाल कुलकर्णी व रवींद्र मंकणी यांची केमिस्ट्री ‘रमा माधव’ सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *